"राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा"; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
img
Dipali Ghadwaje
मुंबई: राज्यातील काही नेत्यांकडून किरकोळ राजकीय फायद्यासाठी जाती-जातीत दुहीचे विष कालवण्याचं काम सुरू आहे, मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांचा बळी जातोय, त्यामुळे राजकारण थांबवा आणि जातीय सलोखा राखा असं आवाहन भाजपचे खासदार नारायण राणे  यांनी केलं आहे. राज्यातील सर्व जबाबदार नेत्यांनी एकत्र यावं आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करावा असंही नारायण राणे म्हणाले. 

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये राज्यातील जाती-जातींमध्ये दुही निर्माण होत असून शांतता राखण्यासाठी सर्व नेत्यानी एकत्रित प्रयत्न करावे असं आवाहन केलं आहे. 

काय म्हणाले नारायण राणे? 

राजकारण थांबवा! सलोखा राखा! 
छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रामध्‍ये सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्‍यातही नव्याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्‍याचे पाप करीत आहेत. सर्वसामान्‍यांच्‍या हितासाठी जाती-जातींमध्‍ये संघर्ष निर्माण करीत असल्याची बतावणी ही मंडळी करतात. संघर्षामध्‍ये शेवटी सर्वसामान्‍यांचे बळी जातात व नुकसान होते हे मात्र ते विसरतात. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रामध्‍ये ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्‍याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्‍ये लोक गुण्‍यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्‍याचे प्रयत्‍न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्‍ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्‍न करावेत असे मला वाटते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचं दिसून येतंय. तसेच काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील धार्मिक आणि जातीय सलोखा बिघडत असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेले आवाहन महत्त्वाचं आहे. 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group