तेलंगणाच्या राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार सीएम रमेश यांनी दावा केला की, भारत राष्ट्र समिती चे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांनी त्यांची बहीण कविता यांच्याविरोधात सुरू असलेली ईडी आणि सीबीआय चौकशी थांबवण्याच्या बदल्यात भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता.
मात्र, केटीआर यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. रमेश म्हणाले, "केटीआर विसरले वाटतं, ते माझ्या दिल्लीतील घरी आले होते. माझ्याकडे त्या भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे. तो मी प्रसारमाध्यमांना दाखवू शकतो. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की, जर चौकशी थांबवली गेली नाही, तर बीआरएसला भाजपमध्ये विलीन करायला ते तयार आहेत," असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला.
आरोप पूर्णपणे खोटे अन् निराधार या आरोपांवर प्रतिक्रिया देताना केटीआर यांनी ते पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचं सांगितलं. "बीआरएस कधीही कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही," असं ठामपणे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "हे सर्व आरोप आमच्यावरील भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे."
केटीआर यांनी यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सीएम रमेश यांच्यावरही गंभीर आरोप केले. "भाजप आणि काँग्रेस यांच्यात गुप्त करार झाला आहे. तेलंगणातील सरकारी प्रकल्प मुद्दाम आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांना दिले जात आहेत," असा दावा त्यांनी केला. तसेच, "जर त्यांच्या हिंमत असेल, तर त्यांनी या कथित घोटाळ्यांवर माझ्यासमोर खुली चर्चा करावी," असं ओपन चॅलेंजही केटीआर यांनी दिलं.
दरम्यान, रमेश यांनी सांगितलं की, 'खरंतर केटीआर यांना भीती आहे. तेलंगणामध्ये भाजप आणि टीडीपी यांच्यात युती झाली, तर बीआरएसचं अस्तित्व धोक्यात येईल. आणि म्हणूनच, ते निराधार आणि खोटे आरोप करत आहेत'. दरम्यान, आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत तेलंगणातील राजकारण पेटलं आहे.