राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी मुख्यमंत्री वसंत पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
माजी मुख्यमंत्री वसंत पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. जयश्री पाटील या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष असून, माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, तसेच त्यांच्यात चर्चा झाली. यानंतर त्यांनी प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.
या प्रवेशानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. काँग्रेस पक्षाकडून जयश्री पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज जयश्री यांनी भाजपात प्रवेश करत कमळ हाती घेतलं आहे.