दैनिक भ्रमर : नालासोपारा येथील 41 बेकायदा इमारतींप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता, बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता आणि निलंबित टॉऊनप्लॅनर वाय. एस. रेड्डी यांना बुधवारी अटक करण्यात आली होती.
माजी आयुक्त पवार यांच्यासह संशयित चारही आरोपींना आज ‘पीएमएलए’ न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकिलाने ह्या गुन्ह्याचं गांभीर्य मोठे आहे. आर्थिक लाभासाठी अधिकार आणि कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या चौकशीत माजी आयुक्त अनिल पवार यांनी सहकार्य केलेले नाही. त्यामुळे या चौघांना वीस ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी मिळावी, अशी विनंती सरकारी वकिलाने केली होती.
दरम्यान, अनिल पवार हे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई आहेत, त्यामुळे त्यांची मुद्दाम बदनामी करण्यात येत आहे. शिवसेना-भाजपमधील वादातून हे प्रकरण घडविण्यात आले आहे, असा खळबळजनक दावा माजी आयुक्त पवार यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान केला आहे.
न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन दुपारी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ‘पीएमएलए’ कोर्टाने निकाल दिला आहे. त्यात त्यांनी चारही आरोपींना येत्या वीस तारखेपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.