दिल्लीतील कथित दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज बुधवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी (२६ मार्च) आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था करून आंदोलकांना ताब्यात घेऊन पाच बसेसमध्ये बसवून विविध पोलीस ठाण्यात रवाना केले होते. पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत बैंस, आमदार सोमनाथ भारती आणि दिल्लीचे उपसभापती राखी बिर्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनीही अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली. या काळात दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी (२७ मार्च) सुनावणी होणार आहे.
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला दिलं आव्हान
अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी आपल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिले होते, मात्र सुनावणीपूर्वीच अर्ज मागे घेतला. अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेला आव्हान दिले आणि तातडीने सुनावणीची मागणी केली. मात्र होळीच्या सुट्ट्यांमुळे हे होऊ शकले नाही. केजरीवाल यांनी त्यांच्या याचिकेत युक्तिवाद केला की त्यांची अटक आणि ताब्यात घेणे बेकायदेशीर आहे आणि ते ताबडतोब कोठडीतून सोडण्यास पात्र आहेत. ही याचिका न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे.
त्यामुळे आता केजरीवाल यांना जामीन मिळणार का? याकडे लक्ष लागून आहे. गेल्या गुरुवारी (ता. २१) ईडीने अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या दिल्लीतील निवास्थावरून अटक केली होती. यानंतर त्यांना शुक्रवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. केजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी ईडीने १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ईडीची ही मागणी अमान्य करत केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ६ दिवसांचीच न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेला आणि ट्रायल कोर्टाने दिलेल्या रिमांड आदेशाला केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या वकिलाने सरन्यायाधीशांकडे तातडीने सुनावणीची मागणी केली होती.