नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या क्लीन चीटला ईडीने विरोध केला आहे. क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल, असे म्हणत ईडीने कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
याप्रकरणी लवकरच याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. यामध्ये कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीमुळे बँकेला कोणतंही नुकसान झालेले नाही. तसे पुरावे देखील नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले होते. मात्र आता या प्रकरणात ईडीने कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बँकेतील इतर 80 कर्मचाऱ्यांना क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र, आता ईडीने क्लीन चीटला विरोध केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत ईडीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल, असे ईडीने आपल्या अर्जात म्हटले आहे. ईडीच्या या हस्तक्षेप याचिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यावेळच्या विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता.
राज्यात भाजप सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेन न्यायालयात दिलेल्या उत्तरात, नेते आणि उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) दाव्यावर आक्षेप घेतला.आधीची याचिका न्यायालयाने फेटाळली असतानाही ईडीला हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही हे सादर करून, आर्थिक गुन्हे शाखेने 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आर्थिक गुन्हे शाखेने च्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या अर्जाविरुद्ध उत्तर दाखल केले.