राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेक नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. रोहित पवार यांनी तर अनेक पत्रकार परिषद घेत पुरावे पुढे आणण्याचा प्रयत्न केला. अजितदादांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधीच दादांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचे आढळले होते, आता हे कनेक्शन अशोक खरात सोबत जोडण्यात येत आहे. अंजली दमानिया यांनी माधमांशी संवाद साधताना अशोक खरात प्रकरणी अनेक आरोप केले.
पुण्यातील घराबाहेर ज्या दिवशी भानामतीचा प्रकार घडला त्याच दिवशी अशोक खरातने एका हॉटेलमध्ये बसून पैशांचे मोठे व्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. 17 जानेवारी रोजी अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार झाला आणि त्याच दिवशी अशोक खरातने 34 सेकंदात मोठे व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताशी अशोक खरातचा काही संबंध आहे का याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, "27, 28 आणि 29 जानेवारी रोजी 5 कोटी 33 लाखांचे व्यवहार झाले आहेत. हे पैसे कुठून आले, कोणी आणले, कशासाठी आणले हे शोधायला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी व्हायला हवी." कल्पना खरातवर पाळत ठेवणं पोलिसांचं कर्तव्य होतं. आता त्या फरार आहेत. पोलिसांनी हे मुद्दाम केलं का असा संशय आहे. त्यांची चौकशी होऊ नये यासाठी काहीजण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न पडतोय, असा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला.
अंजली दमानिया यांनी खरातशी संपर्कात असलेल्या राजकारण्यांची नावे जाहीर केली. ती खालीलप्रमाणे,
- एकनाथ शिंदे
- जयंत पाटील
- नितीन पवार
- चंद्रकांत पाटील आणि पीए देशपांडे
- उदय सांगळे
- पद्मश्री पोपटराव पवार
- दादा भुसेंचे पीए
- राहुल रोकडे, विखे पाटील यांचे पीए
- प्रभाकर काळे
- सुनील तटकरे
- रुपाली चाकणकर
- मुलगा सोहम चाकणकर आणि इतर