नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्यावर लैंगिक छळाचे, शोषणाचे आरोप करण्यात आले असून त्याला बेड्या ठोकून अटक करण्यात आली. न्यायालयाने अशोक खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी खरात याच्या घरावर छापा टाकला त्यावेळी त्याच्या घरातून पिस्तुल, जिवंत काडतुसं तसेच काही आक्षेपार्ह व्हिडीओही जप्त करण्यात आले आहेत.
या भोंदू बाबाचे राजकीय नेत्यांसोबत असलेले संबंधही समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचाही त्यात समावेश होता. त्या खरात यांच्या शिष्या होत्या, त्यांनी त्यांचे पाद्यपूजन करताना, त्यांच्या डोक्यावर छत्री धरतानाचे असे अनेक फोटो, तसेच व्हिडीओ यापूर्वी समोर आले आहे.
याच मुद्यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील आक्रमक झाल्या असून त्यांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही नवे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तसेच त्यांनी यासोबत एक पोस्टही लिहीली आहे. अशा Epstein बाबांवर इतकी मेहेरबानी ? ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ? ह्या रुपाली चाकणकरांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी हल्ला चढवला आहे.
दरम्यान अमित शाह, मिलिंद नार्वेकर यांचे देखील कॅप्टन खरात सोबतचे फोटो व्हायरल झालेत. अमित शहा यांच्या कुटुंबातील लोकांनी देखील कॅप्टन खरातची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे, एवढंच नव्हे तर नेते, अभिनेते सगळेच कॅप्टनचे भक्त असल्याचं उघड झालंय. तसेच एनसीपीच्या दोन्ही गटांतील नेते हे कॅप्टनचे भक्त असल्याचे समोर आले. त्यामुळे आता हे प्रकरण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यातून आता नवीन खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.