नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यासह देशातील बड्या नेत्यांशी खरात यांचे संबंध असल्याने याप्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक थोरात याच्यासोबतचे अनेक फोटो , व्हिडीओ समोर आले आहे. या फोटोत रुपाली चाकणकर या खरात याच्या पाया पडताना , खरात याला केक भरवताना , त्याच्यावर छत्री धरतानाचे फोटो समोर आले आहे. त्यामुळे आता या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. रुपाली चाकणकर या फरार असल्याचा दावा त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे.
नाशिक महिला अत्याचार प्रकरणात आध्यात्मिक गुरू म्हणावला जाणारा अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर आलेल्या नाहीत, हाच धागा पकडत रुपाली पाटील यांनी फेसबुकवर "राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार... बजाव ताली!" अशी उपरोधिक पोस्ट केली आहे. नाशिकमधील खरात प्रकरणात चाकणकर यांचे नाव वारंवार घेतले जात असल्याने त्या जाणीवपूर्वक माध्यमांपासून दूर राहत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.