भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सर्वप्रथम रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलं. अशोक खरातची त्या पूजा करत असल्याचे फोटो व्हायरल झाले. अशोक खरातचा भोंदूगिरीचा दरबार लागायचा. त्यात बऱ्याचदा त्या हजर असायच्या. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का बसला. त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.
मागच्या आठवड्यात त्यांनी शासनाशी संबंधित असलेल्या या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला. राजीनामा देताना रुपाली चाकणकर यांनी व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं. अशोक खरात प्रकरणाचा त्यांनी राजीनाम्यात उल्लेख केला नाही.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्षपद सुद्धा सोडावं लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. पण आता लवकरच त्यांना पक्षाकडून या पदावरुन हटवलं जाऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महत्वाच्या नेत्यांकडून रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या संदर्भात एकमत झालं आहे.
दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बैठक होत असते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी आणि अनेक आमदारांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाला डाग लागतोय. पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा सुरु आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी आमदार आणि नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात आहे.