सुषमा अंधारेंच्या 'त्या' आरोंपावर रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा, म्हणाल्या , मला...
सुषमा अंधारेंच्या 'त्या' आरोंपावर रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा, म्हणाल्या , मला...
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये रुपाली चाकणकर टीकेच्या धनी ठरल्या होत्या. चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी अशोक खरात याच्यावर टीका करत त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 



रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातचे पाय धुतले होते, पाद्यपूजन केलं होतं. त्याच्या डोक्यावर छत्री धरली होती. हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २ सप्टेंबर रोजी झालेल्या सोमवती अमावस्येच्या निमित्ताने रुपाली चाकणकरांनी अघोरी पूजा करून त्यांचं अनामिक बोट कापल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. तसंच, याबरोबर त्यांनी काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.

या सर्व आरोपांवर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “जे कृत्य घडलंय, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा. आरोपीवर कठोर कारवाई करावी. समाजात आपण आयुष्य जगत असताना कोणालातरी गुरू मानत असतो. खरात पती पत्नीला मी आणि माझ्या पतीने गुरू मानलं होतं. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही शैक्षणिक साहित्याच्या वाटपासाठी तिथे उपस्थित राहत होतो. आम्ही गुरू मानलंय, त्यामुळे त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो. पण त्याची दुसरी बाजू आमच्यासमोर कधी आली नाही.”

“माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेकांनी पाद्यपूजा केली तशी मी आणि माझ्या पतीनेही केली होती. ५-६ वर्षांपूर्वी ज्यावेळी लोकांच्या संपर्कात असतो. एखाद्याचं कृत्य, वैयक्तिक वागणूक, वैयक्तिक आयुष्य याविषयी कोणतीही सुतराम कल्पना नसते. आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, ते पुढे जाऊन कसे वागणार आहेत, याची कल्पना कोणाला नसते” असं म्हणत फोटोंच्या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी भाष्य केलं आहे.

“माझ्या अकाऊंटवर गेलात तर ते फोटोही आज आहेत. ते २ सप्टेंबरचे फोटो नसून १२ सप्टेंबरचे आहेत. २ सप्टेंबरला आम्ही अजित पवारांच्या दौऱ्यावर होतो. त्या फोटोतही माझ्या हातात कोठेही जखम नाही. ३,४,५,६ सप्टेंबरच्या फोटोंमध्येही हाताला जखम नाही”, असं स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी देऊन फोटोही दाखवले. आम्ही संस्थांनाशी जोडलेलो होतो. याबाबत मीच ट्वीट करून सांगितलं. ते फोटो माझे असून अनेक वर्षांपूर्वीचे होते. अनेक लोकांचे फोटो अशोक खरातबरोबर आहेत. पण महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं गेलं”, असंही त्या म्हणाल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group