हिट अँड रन प्रकरण :
हिट अँड रन प्रकरण : "सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा..…" , नागपूर अपघातानंतर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? वाचा
img
Dipali Ghadwaje
राज्यात कार अपघाताचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री नागपूरमध्ये एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरात अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघाताl दोघं जखमी झाले असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या ऑडी कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे. तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांची कार आणि अन्य कार्सना धडक बसून मोठे नुकसान झाले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजता हा अपघात घडला. काचीपुरापासून ते लोकमत चौका दरम्यान ही दुर्घटना घडली. आरोपानुसार अपघातावेळी ऑडी कारचा वेग ताशी 150 किमी होता. आधी कारनं एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर एका कारला आणि परत एका तिसऱ्या कारला याच ऑडी कारनं धडक दिली. काही मीटर अंतरावर एकच कार 3 वाहनांना धडक देते, यावरुन कारचालकानं प्रमाणाबाहेर मद्य प्राशन केल्याचं बोललं जातंय. जेव्हा कारचा अपघात झाला तेव्हा  चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत हा देखील गाडीत होता. तो गाडीतील मागच्या सीटवर बसला होता अशी माहिती समोर येत आहे.

आता या अपघातावरून राजकारण तापू लागले असून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. एफआयरमध्ये बावनकुळेंच्या मुलाचं, संकेतचं नाव का नाही , गाडीच नंबर का नाही असा सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी टीका केली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुद्यावरून सवाल विचारला आहे. फडणवीस सर्वांशी समान वागणार का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी – बावनकुळे

या अपघातास कारणीभूत ठरलेल्या ऑडी कारची नोंदणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावे संकेत याच्या नावे आहे. याच मुद्यावरून बोलताना बावनकुळे यांनी सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी,असे स्पष्ट केले. ‘ नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये व दोषींवर कारवाई व्हावी’, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. अपघात घटनेतील गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासावेत,कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. परंतु या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.


 दरम्यान  याप्रकरणी आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group