अशोक खरात प्रकरणी टीकेच्या धनी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल २० मार्च रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता याही पुढे जाऊन सुषमा अंधारे यांनी त्यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला होता. त्यावर चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांनी आता जामीनाचा प्रयत्न करावा, असा खोचक सल्ला अंधारे यांनी दिला. त्यांनी याबाबत आज सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?
माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला होता. त्यावर सुषमा अंधारे यांनी आज प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यावर मला हसायला आलं. कारण, माणसं केविलवाणी धडपड करतात. पण त्याने काही फरक पडणार नाही. मला नोटीस वगैरे पाठवण्याचं राहूद्या. तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.” “अशोक खरातविषयीच्या सर्व गोष्टींना रुपाली चाकणकर अवगत होत्या. तुम्हाला एक वर्षांपासून कल्पना होती. तुम्ही पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला. तुम्ही संघटित गुन्हा केला आहे. त्यामुळे तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे. तुमची अटक होणं गरजेचं आहे.”
दरम्यान, रुपाली चाकणकरांविरोधात रोष निर्माण झाल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला नव्हता. पक्षाकडूनही त्यांच्याबाबत प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर, याप्रकरणात खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी आदेश दिल्याने चाकणकरांनी राजीनामा दिला. यामुळे सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवारांवरही टीका केली. त्या म्हणाल्या, “काल राजीनाम्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. खरंतर सुनेत्रा वहिंनींनी हस्तक्षेपाची वेळच येऊ द्यायला पाहिजे नव्हती. सुनेत्रा वहिंनींना नेतृत्त्वातला खमकेपणा दाखवण्याची काल एक संधी होती. ती संधी त्यांनी दवडली.”
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “अजित दादा कधीही गंडेदरे करणारे नव्हते. त्यांनी भोंदुगिरीला थारा दिला नाही. असे गंडे दोरे, अंगारे धुपारे करणारी बाई राष्ट्रावादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असेल आणि तिच्यामुळे पक्षाची बदनामी होणार असेल तर तिला तातडीने महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केले पाहिजे. अन्यथा ते करणं होणार नसेल तर आम्ही अजित दादांचा वारसा जपणारे आहोत असं कृपया सांगू नका.”