NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मास्टरमाइंड जीशान अख्तर ऊर्फ जस्सी पुरेवालला कॅनडाच्या सरे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी याची पुष्टी केली. जीशान पंजाबच्या जालंधरचा राहणारा आहे. तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे. तो हत्येच्या कटात सहभागी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जीशान हत्येनंतर फरार झाला होता. कथित पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीच्या मदतीने तो कॅनडात पोहोचला. मुंबई पोलीस आता त्याचं प्रत्यर्पण करुन त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु करु शकतात. कॅनडा पोलिसांनी जीशान अख्तरला कुठल्या आरोपांखाली अटक केलीय, त्याची पुष्टी झालेली नाही.
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोंबर 2024 रोजी वांद्रे कार्यालयाबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. जीशान अख्तरला बाबा सिद्दीकी यांच्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा मास्टरमाइंड मानलं जातं. त्याला आता कॅनडा पोलिसांनी ताब्यात घेतलय. वांद्रयातून तीनवेळा आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री बाबा सिद्दीकी यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
सिद्दीकी यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांच्या टीमने बरेच प्रयत्न केले. पण त्यांना वाचवता आलं नाही. डॉक्टरांनी त्यांमा मृत घोषित केलं. या केसचा उलगडा करण्यात आणि आरोपींना पकडण्याचा महाराष्ट्र पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत.