दिवसेंदिवस हत्यासत्र वाढत आहे. अशातच आता राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिलोरा येथील भाजपाने स्थानिक नेते रोहित कुमार यांची पत्नी संजू रलावता या किशनगड येथे माहेरी रक्षाबंधनासाठी गेल्या होत्या. तेथून त्या पती रोहित कुमार यांच्यासोबत घरी परतत असताना किशनगड येथील रस्त्यावर अज्ञात लोकांनी त्यांना अडवले. त्यांना मारहाण करून रोहित यांची पत्नी संजू यांची गळा चिरून हत्या केली.
त्यानंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या पती-पत्नीला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी संजू हिला मृत घोषित केले. रोहित यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या हत्येमागे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.