दैनिक भ्रमर : राजस्थानच्या सवाई माधोपूर रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात वाघांनी भरलेल्या जंगलाच्या मध्यभागी पर्यटकांना वार्यावर सोडून गाईड पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भीतीच्या सावटाखाली पर्यटकांना काही वेळ अडकून राहावे लागले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान या प्रकरणी वनविभागाने कठोर कारवाई करत गाईडसह चौघांचे निलंबन केले आहे. राष्ट्रीय उद्यानात क्रमांक- ६ मध्ये सफारी दरम्यान, पर्यटकांनी भरलेला एक कॅन्टर अचानक जंगलाच्या मध्यभागी बिघडला. या कॅन्टरमध्ये महिला आणि मुले देखील होती. कॅन्टरमध्ये उपस्थित असलेल्या गाईडने दुसरा कॅन्टर आणायला जातो असे सांगून पर्यटकांना जंगलात सोडले. परंतू तो परत आलाच नाही. संध्याकाळी पर्यटक जंगलाच्या मध्यभागी अंधारात अडकले.
यासंदर्भात पर्यटकांनी सांगितले की, त्यांनी वारंवार मदतीसाठी आवाहन केले परंतु वन विभागाकडून मदत वेळेवर पोहोचली नाही. शेवटी एक पर्यटक दुसर्या जिप्सीमध्ये बसला आणि राजबाग नाका चौकी पोहोचला आणि तेथून एक वाहन घेऊन उर्वरित पर्यटकांना बाहेर काढले. तक्रारीनंतर, वन विभागाने सुमारे अडीच तास उशिरा हेडलाईट्स नसलेला कॅन्टर पाठवला, जो चालकाने टॉर्चच्या सहाय्याने आणला. घटनेनंतर पर्यटक आणि राजबाग नाका चौकी येथे तैनात असलेले वनरक्षक विजय मेघवाल यांच्यात वाद झाला.