राजस्थानमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या १० ते १२ दिवसांच्या बाळासोबत जे घडलं ते ऐकून तुमच्याही हृदयाचा थरकाप उडेल आणि माणूस म्हणून तुमचीही मन शरमेने खाली झुकेल. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील बिजोलिया उपविभागातील माल का खेडा रोडवरील सीताकुंडच्या जंगलात अवघं १० ते १२ दिवसांचं नवजात बाळ सापडलं.
नराधमाने बाळ दगडाखाली गाडून टाकलं होतं. जेव्हा त्या बाळाला बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्याची अवस्था इतकी दयनीय होती की ते पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.चिमुकल्या बाळाचं रडणं, किंकाळ्या बाहेर पडू नयेत, आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडात एक दगड टाकून त्याचे ओठ फेवीक्विकने चिकटवून टाकण्यात आले होते.
बाळ ज्या दगडाखाली होतं, त्या खडकांजवळच आपली गुरे चारणाऱ्या एका मेंढपाळाने मुलाच्या मंद रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्याने ताबडतोब गावकऱ्यांना कळवलं आणि वेळीच बाळाचा जीव वाचवला.
जेव्हा त्या बाळाला बाहेर काढण्यात आले तेव्हा त्या मुलाच्या तोंडात एक दगड ठेवून तोंड बंद करण्यात आलं होतं आणि वरून ते फेविक्विकने चिकटले होते. पोलिसांनी मुलाला बिजोलिया रुग्णालयात दाखल केले, पण तिथे त्याची प्रकृती सुधारली नाही तेव्हा त्याला भिलवाडा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की आता बाळाची प्रकृती सुधारत आहे, परंतु गरम दगडामुळे त्याच्या शरीराचा डावा भाग भाजला होता. याप्रकरणी बिजोलिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून हे भयानक कृत्य करणाऱ्या नराधमाच्या शोध सुरू करण्यात आला आहे.