बलात्कार, हत्या ,अपहरण अशा दिवसेंदिवस माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहे. अशातच राजस्थानमधुन एक थरारक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चांदीच्या जोडवीसाठी नराधमांनी ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे पाय कापले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

कमला देवी ( वय - ६५ ) असे या पीडित वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर जयपूरमधील सवाई मान सिंह रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या माथेफिरूंना अटक केली असून त्यांचा पूर्वीचाही गुन्हेगारी इतिहास असल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार कमला देवी आणि इतर तिघांना कामाचे आमिष दाखवून सोबत नेले होते. "मी काम करु शकत नाही, असे सांगितल्यावर आरोपीने 'काही हरकत नाही' असे उत्तर दिले,". सकाळी ९ वाजता ते गंगापूर शहर बायपासजवळ पोहोचले. आरोपीने इतर लोकांना सोडण्यासाठी जातो, तोपर्यंत त्याच्या पत्नीसोबत बसण्यास कमला देवींना सांगितले.
रात्री आठ वाजता आरोपी कमला देवींना एका खोलीत घेऊन गेला. त्याने दुसऱ्या दिवशी सोडण्याचे आश्वासन दिले. हल्ला करण्यापूर्वी त्यांना चपाती खायला दिली. आरोपी त्यांना एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्यांनी विचारणा करताच आरोपीने त्यांचा गळा दाबला आणि त्याच्या पत्नीने त्यांचे तोंड दाबून धरले. "मला मारु नका, तुम्हाला जे हवे आहे ते घ्या," अशी विनवणी त्यांनी केली. गुन्हेगारांनी त्यांना बेशुद्ध केले, त्यांचे दोन्ही पाय कापले आणि त्यांना झुडपांमध्ये फेकून दिले.
पोलिसांनी या आरोपींचा गुन्हेगारी इतिहास उघड केला. हे आरोपी अशाच प्रकारे महिलांना कामाचे आमिष दाखवून निर्जनस्थळी घेऊन जायचे आणि चांदीच्या जोडव्यांसाठी त्यांचे पाय कापत असत. पोलिसांनी चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या लोकांनाही ओळखले असून त्यांच्याकडून चोरीचे दागिने विकून मिळालेली रक्कम जप्त केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, ज्यात एका महिलेचा समावेश आहे.