केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू
केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
राजस्थानच्या औद्योगिक जिल्ह्यातील भिवाडी येथे आज (दि.16) सकाळी भीषण आग लागली. खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात अचानक आग लागली. आगीचा भडका इतका मोठा होता की तेथील अनेक कामगारांना सावरण्याची संधी मिळाली नाही. या हृदयद्रावक अपघातात आठ  कामगार जिवंत जाळले गेले, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. 

माहितीनुसार, भिवाडीमधील खुशखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक G1/118B येथे आज सकाळी भीषण आग लागली अचानक स्फोट झाल्यामुळे आग लागलयाची माहिती समोर आली. आगीची माहिती मिळताच अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग काही मिनिटांतच भडकली. कारखान्यात रसायने आणि ज्वलनशील पदार्थ असल्याने आग अतिशय वेगाने पसरली. प्राथमिक अहवालानुसार या अपघातात आठ कामगारांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे.

बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत ८ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना घडली त्यावेळी कारखान्यात २५ ते ३० जण कामगार होते. त्यामधील काहीजण सुरक्षित बाहेर पडले. पण स्फोटामुळे काहीजणांना बाहेर पडताच आले नाही. त्यांचा जळून मृत्यू झालाय. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. अग्नितांडव पाहाता मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भिवाडी, खुशखेडा आणि आसपासच्या परिसरातील सर्वच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कामाला लागले. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही, पण काही प्रमाणात कमी झालेली आहे. स्थानिक प्रशासनाने कारखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्या कारणामुळे आग लागली? याचा तपास केला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group