राजस्थानच्या अजमेर शहरामध्ये भीषण आगीची घटना घडली. ५ मजली हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ४ जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अजमेरच्या डिग्गी बाजारमध्ये असलेल्या हॉटेल नाजला आज सकाळी आग लागली. या हॉटेलमध्ये अनेक जण मुक्कामासाठी थांबले होते. हॉटेलला आग लागताच एकच गोंधळ उडाला. सर्वजण इकडे तिकडे पळू लागले. बाहेर पडायला रस्ता नाही, ना लपायला जागा नाही अशी स्थिती हॉटेलमध्ये अडकल्याची झाली.
त्यामुळे हॉटेलमध्ये असणाऱ्या एका चिमुकल्यासह चार जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्ती ५० ते ९० टक्के भाजले आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अरुंद रस्ते असल्यामुळे घटनास्थळी पोहचण्यास अग्निशमन दलाला अनेक अडचणी आल्या. पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
या आगीमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी जेएलएन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी ही घटना घडल्यामुळे हॉटेलमध्ये असणारे सर्वजण गाढ झोपेत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण समोर आले नाही.
आग लागल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांमध्ये आगीने संपूर्ण हॉटेलला वेढलं. या हॉटेलमध्ये अजूनही काही जण अडकल्याची शक्यता आहे.
आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये सगळीकडे धूर झाला त्यामुळे अनेक जण गुदमरून तिथेच पडले. तर काहींनी कसं तरी हॉटेलच्या बाहेर पळ काढत आपला जीव वाचवला. आगीने रौद्ररूप धारण केले आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं देखील कठीण झाले आहे.