दैनिक भ्रमर : निळा ड्रम म्हटलं की प्रत्येकाला आठवते ती मुस्कान, जिने स्वतःच्या नवऱ्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये लपवले होते. हा प्रकार उत्तरप्रदेशच्या मेरठ येथे घडला होता. आता अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे.
हंसराम हा गेल्या सहा महिन्यापासून पत्नी आणि तीन मुलांसह आदर्श कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरचा राहणारा होता. तो स्थानिक किराण्याच्या दुकानात काम करीत होता. शनिवारी रात्री त्याच्या घराचं दार उघडं होतं आणि आत दुर्गंधी येत होती. वर जाऊन लक्षात आलं की, निळ्या ड्रममधून तीव्र दुर्गंधी येत आहे. स्थानिकांनी संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ड्रम उघडून पाहिलं तर एक मृतदेह मिठामध्ये ठेवला होता.
हा मृतदेह होता हंसरामचा. हंसराम याची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली आणि मृतदेह लपविण्यासाठी निळ्या ड्रममध्ये मिठात टाकण्यात आला. जेणेकरून मृतदेहातून येणारा वास बाहेर पसरू नये आणि मृतदेह बराच काळ लपवता येईल. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मृताची पत्नी आणि तिन्ही मुलं बेपत्ता आहेत. तर घर मालकाचा मुलगाही बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आता पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे