सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळले.या घटनेनंतर कॅम्पसमध्ये गोंधळ उडाला. राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावातील एका सरकारी शाळेत ही धक्कादायक घटना घडली. शाळेमध्ये सकाळी प्रार्थना सुरू असताना अचानक छत कोसळलं. या घटनेत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ६० पेक्षा जास्त विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली.
प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.विद्यार्थी शाळेच्या नियमित प्रार्थना सभेला उपस्थित असताना हा अपघात झाला. दरम्यान, अचानक शाळेचे छत कोसळले. या ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
घटनेचे गांभीर्य पाहून प्रशासनाने जेसीबी मशीन बोलावून ढिगारा काढण्यास सुरुवात केली. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने मनोहरठाणा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना झालावाड जिल्हा रुग्णालयात दाखल केले.