राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड जवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. या विमानात दोन पायलट होते. प्राथमिक माहितीनुसार, अपघातस्थळी दोन मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी एक मृतदेह पायलटचा आहे. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हे विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले तिथे मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
चुरुचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास चुरु जिल्ह्यातील भवाना बदावणे गावाजवळ भारतीय हवाई दलाचे एक जेट विमान कोसळण्याची घटना घडली.
या वर्षी जग्वार विमानाला झालेला हा दुसरा अपघात आहे. याआधी एप्रिलमध्ये गुजरातमधील जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ नियमित सरावादरम्यान भारतीय हवाई दलाचे एक जग्वार विमान कोसळले होते. हे विमान जामनगर शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावरील सुवर्दा गावाजवळ एका मोकळ्या जागेत कोसळले होते.
चुरु जिल्ह्यात अपघात झालेले भारतीय हवाई दलाचे हे जग्वार लढाऊ विमान दोन आसनी होते. या विमानाने सुरतगड हवाई तळावरून दोन वैमानिकांसह उड्डाण घेतले होते. या घटनेनंतर, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातस्थळी पाठवण्यात आले आहेत, असे संरक्षण सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.