अहिल्यानगर येथून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासाफाटा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शत्रूवरही येऊ नये अशी वाईट वेळ रासने कुटुंबावर आली. संपूर्ण कुटुंबच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
नेमकं काय घडलं ?
नेवासा तालुक्यातील नेवासाफाटा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कालीका फर्निचर या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा धुराने गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण नेवासा परिसर शोकसागरात बुडाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्दैवी मृत्यू झालेल्यांमध्ये –मयूर अरुण रासने (वय 45) पायल मयूर रासने (वय 38) अंश मयूर रासने (वय 10) चैतन्य मयूर रासने (वय 7) तसेच एकावृद्ध महिला सिंधुबाई चंद्रकांत रासने (वय 85) यांचा समावेश आहे. रासने कुटुंब दुकानाच्या वरील भागात वास्तव्यास होते. मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीचा धूर घरभर पसरला आणि गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला शुद्धी येण्यापूर्वीच मृत्यूने कवेत घेतले. तर यश किरण रासने वय २५ याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान मयूर यांचे वडील अरुण रासने आणि मयूर यांची आई दोघे नातेवाईकांकडे मालेगाव येथे गेले असल्याने ते बचावले आहे.
शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र आग लागल्याचे कारण तपासातून निष्पन्न होईल. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. दरम्यान कुटुंबाचा इतका करुण अंत… या हृदयद्रावक घटनेने नेवासा शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.