आजही वंशाला दिवा हवा घरात मुलगा हवा म्हणून अनेक जण पूजा पाठ, तांत्रिक, मुलीची भ्रूणहत्या असे कित्येक प्रकार करत आहे. अजूनही लोक किती बुरसटलेल्या विचारांना घेऊन पुढे चालले आहे याचे अनेक प्रत्यय समोर येत आहे. अशातच गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील कपडवंजमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलीला नर्मदा कालव्यात फेकून देऊन तिची हत्या केली.
३५ वर्षीय अंजनाचं ११ वर्षांपूर्वी विजय सोलंकीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना भूमिका (७) आणि हेतल (३) नावाच्या दोन मुली झाल्या. मुलाच्या हव्यासापोटी विजय इतका आंधळा झाला की एके दिवशी त्याने स्वतःच्या मुलीला मारण्याचा भयंकर कट रचला.
१० जुलैच्या रात्री विजयने दीपेश्वरी मातेच्या दर्शनाच्या बहाण्याने अंजना आणि मोठी मुलगी भूमिका यांना त्यांच्या बाईकवरून नेलं. परत येत असताना, तो कपडवंजच्या वाघावत परिसरातील नर्मदा कालव्याच्या पुलावर थांबला आणि अचानक भूमिकाला कालव्यात फेकून दिलं. अंजनाने विरोध केला तेव्हा विजयने तिला घटस्फोट देण्याची धमकी दिली आणि तिला बाईकवरून तिच्या माहेरी सोडलं.
याप्रकरणात पोलिसांची एंट्री होताच विजयने दावा केला की, मुलगी मासे पाहताना कालव्यात पडली, परंतु अंजनाने न घाबरता तिच्या भावांना सत्य सांगितलं.
पोलीस चौकशीदरम्यान विजयने गुन्हा कबूल केला आहे. मुलगा नसल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि म्हणूनच त्याने आपल्या मुलीला मारण्याचा कट रचला होता, असंही सांगितलं. पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली आहे. ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.