चंद्रपुर : ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या केली आहे.
या घटनेनंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. वादाचे रुपांतर हत्येत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित घटना ही चंद्रपुरातील सरकारनगर परिसरात घडली आहे.
30 वर्षीय शिवा वझरकर याचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर हत्या प्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याच्या हत्येनंतर समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली.
पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असतानाच घडलेल्या या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.
पोलीस हे हत्याकांड नेमक्या कोणत्या कारणातून घडले याचा तपास करत आहे.