कराड : कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधातून आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांच्या तत्परतेने मुलाचा जीव वाचला आहे. संशयित आरोपींना २४ तासात गजाआड करण्यात तळबीड पोलिसांना यश आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , 29 जानेवारी 2025 रोजी वराडे (ता. कराड) येथील पोलीस पाटील यांनी वराडे गावच्या हद्दीत एक अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली. या माहितीवरुन, तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले हे कर्मचार्यांसह घटनास्थळी पोहचले.
जखमीच्या डोक्यात व डोळयास गंभीर जखमा झाल्याचे निदर्शनास आले. तो रक्ताच्या थारोळयात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी फॉरेनसिक्स सायन्सची टीम व डॉगस्कॉड यांना पाचारण करण्यात आले होते.
उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जखमीला सातारा येथे उपचारासाठी हलविण्यास सांगितले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्याला कृष्णा रूग्णालयात हलविण्यात आले.
घटनेच्या अनुषंगाने पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर यांनी वेगवेगळी पथके तयार करुन तपासाची चक्रे गतीमान केली. अनोळखी असलेल्या जखमीची पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे ओळख पटवली. त्याचे नाव प्रशांत महादेव शेंडगे (वय 24) रा. शिवडे (ता. कराड) असल्याचे निष्पन्न झाले.
घटनेबाबत अधिक माहिती प्राप्त केली असता, यातील जखमीचा भाऊ व आई हे पुणे येथे राहण्यास असल्याचे समजले. घटनास्थळी मिळालेल्या दुव्यांवरुन पोलिसांनी तपास पथके रवाना केली.
पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता, संशयित आरोपी जयेंद्र गोरख जावळे (वय 40, मुळ रा. काटेपुरम चौक पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली जि. पुणे) याचे व जखमीची आई शोभा महादेव शेंडगे (वय 38, रा. काटेपुरम चौक पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली जि. पुणे) हिचे अनैतिक संबंध होते.
शोभा हिचे माहेर शिवडे (ता. कराड) असून, त्याठिकाणीच ती तिच्या मुलांसह राहण्यास आहे. यातील जखमी हा व्यसनाधिन होवून शोभा हिला त्रास देत होता. या कारणावरुन यातील आरोपी जयेंद्र जावळे व शोभा शेंडगे यांनी जयेंद्र याचे दोन साथीदार सिध्दार्थ विलास वाव्हळे (वय 25, मुळ रा. मातोश्रीनगर, वांगी रोड, जि. परभणी, सध्या रा. राजयोग गार्डन, वाकड चौक, ता. हवेली जि. पुणे) व अकबर मेहबुब शेख (वय 25, रा. निकाळजे वस्ती, सुर्यमुखी गणपती मंदीराजवळ, बाणेरगांव, बालेवाडी स्टेडीयम जवळ, ता. हवेली जि. पुणे) यांच्यासह प्रशांत शेंडगे यास जिवे मारण्याचा कट रचला असल्याचे निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे संशयित आरोपी यांनी पुणे येथून रिक्षाने येऊन प्रशांत यास उंब्रज येथे रिक्षात घेऊन त्याला वराडे येथील शेतात नेते. त्याला दारु पाजून त्याचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथील स्थानिक नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे जखमीवर कृष्णा हॉस्पिटल येथे तात्काळ उपचार झाल्याने तो बचावला आहे.
पोलिसांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणून गुन्हयातील निष्पन्न आरोपींना 24 तासांच्या आत अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास तळबीड पोलिस ठाण्याचे किरण भोसले करीत आहेत.