दैनिक भ्रमर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे कारण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरूणांना सरकारने खुशखबर दिली आहे. राज्यात तब्बल १५ हजार पोलिसांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये पोलीस दलात भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया वेगाने सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे. दोन महिन्यात राज्यात पोलीस भरती होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंत्रिमंडळाने आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.
मंत्रिमंडळातील ४ महत्त्वाचे निर्णय
१) गृह विभाग - महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी
२) अन्न, नागरी पुरवठा विभाग - राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
३) विमानचालन विभाग - सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय
४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. एकनाथ शिंदे सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दौरा आटोपल्यानंतरही शिंदे राज्यात परतणार होते, पण ते तिथेच मुक्कामी राहिले. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहे.