बुधवारी, 3 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली असून त्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतो असाही एक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, तो म्हणजे कामाच्या तासांमध्ये झालेला बदल. आता कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे.
राज्यातील कामगारांच्या कामाच्या तासांत मोठा बदल झाला आहे. कामाचे तास बदलले असून कामगारांना आता ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी करावी लागणार आहे. महायुती सरकारने गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच, रोजगार संधी वाढीसाठी कामगार संदर्भातील अधिनियमात सुधारणा केली आहे. सरकारने कारखाने अधिनियम आणि आस्थापनांच्या अधिनियमात बदल केले आहेत. कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा ९ तासांवरून १२ तास करण्यात आली आहे.
खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या ९ वरून १० तासांपर्यंत जास्तीत जास्त दैनंदिन कामकाजाचे तास वाढवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगार निर्मिती करणे आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. दुकाने आणि आस्थापनांमध्ये दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० तास करण्यात आले आहे.
कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यासारख्या राज्यांनी कामगारांच्या कामाच्या तासामध्ये बदल आधीच केले आहेत. या राज्यांनंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील हा निर्णय घेतला.कामगारांना योग्य वेतन संरक्षणासह कायदेशीररित्या अतिरिक्त उत्पन्न मिळेल. ओव्हरटाईम मर्यादा वाढवून कामगारांना मोबदल्याशिवाय अतिरिक्त काम करण्यास सांगितले जाते यापासून त्यांना संरक्षण मिळेल. यापुढे ओव्हरटाईम न देता कामगारांकडून काम करून घेण्याच्या प्रकाराला आळा बसेल. महत्वाचे म्हणजे ओव्हरटाईम कामाचा कालावधी वाढविल्यामुळे कामगारांनाही मोबदला वेतनाच्या दुप्पट दराने मिळेल.