छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक; मराठवाड्यासाठी 'या' मोठ्या  घोषणा होण्याची शक्यता ?
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक; मराठवाड्यासाठी 'या' मोठ्या घोषणा होण्याची शक्यता ?
img
Dipali Ghadwaje
तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात दाखल झाला आहे. 

दरम्यान मराठवाड्याला मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी सिंचन, शेती आरोग्य, शिक्षण, दळणवळण, आणि उद्योगासाठी ४० हजार कोटींच्या पॅकेजचे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.  

यापूर्वी २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत मराठवाडाच्या विकासाला उभारी देण्यासाठी ४९ हजार २४८ कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या बैठकीत देखील मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या.

मात्र, या घोषणा फक्त कागदावरच होत्या, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप विरोधक करीत आहेत. मराठवाड्यात आरोग्य, सिंचन, रस्ते यासह विविध क्षेत्रांतील अनुशेष अद्याप भरून काढणे बाकी आहे. त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यासाठी, ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ओरड केली जात आहे.

मराठवाड्यातील कोणत्या कामांचे प्रस्ताव?
मराठवाड्यातील दळणवळण, सिंचन तसेच कृषी, वैद्यकीय महाविद्यालय, रिंग रोड बनविण्यासह जलसंपदा खात्याने विभागात १,३११ कोटी खर्चातून सहा नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव या बैठकीसमोर मांडले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगिलतं आहे.

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील बळीराजासाठीही विशेष पॅकेज जाहीर केले जाऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. गेल्या आठ महिन्यांत मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलं आहे. पावसाने दडी मारल्याने बळीराजादेखील हैराण आहे.

हीच बाब लक्षात घेता, राज्य सरकारकडून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षातील मंत्री २९ मंत्री हजर राहणार आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group