आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत खेळाडूंसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जागतिक किर्तीच्या राज्यातील खेळाडूंची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती होणार आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा, पॅराऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेल्या खेळाडूंना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज विधान भवनात पार पडली आहे. या बैठकीत पुरवणी मागण्या आणि वित्तनियोजन विधेयकावर चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.
राज्य सरकारने खेळाडूंबाबत घेतलेल्या या निर्णायमुळे विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करु इच्छुणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने नुकतंच विश्वविजेता टीम इंडियाला वर्ल्ड जिंकल्याबद्दल 11 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं.
तसेच टीम इंडियातील मुंबईच्या चार खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस राज्य सरकारकडून देण्यात आलं. वर्ल्ड कप विजेत्या संघातील मुंबईच्या चार खेळाडूंचा विधान भवनात सत्काराचादेखील कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर आता राज्य सरकारने इतर खेळांमध्येही उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.