तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात होणार मंत्रिमंडळाची बैठक ; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात होणार मंत्रिमंडळाची बैठक ; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
img
Dipali Ghadwaje
तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. विभागातील प्रलंबित प्रश्न आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर  येथे ही बैठक होणार असून, 16 सप्टेंबर रोजी ही बैठक होण्याची शक्यता आहे. 

याबाबत शासनाकडून यासाठी तोंडी निरोप आला असून, आठवड्याच्या अखेरीस नियोजनाचे पत्र येणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2016 रोजी छत्रपती संभाजी नगरमध्ये मंत्री मंडळाची बैठक पार पडली होती.  दरम्यान येत्या 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे राज्य मंत्री मंडळाची बैठक होण्याचे संभाव्य नियोजन आहे.

दरम्यान या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे प्रस्ताव तयार करावे. लागणाऱ्या निधीबाबत माहिती द्यावी. जिल्ह्याचा आणि विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव तयार करुन सादर करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी विभागातील सातही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत दिले आहे. 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव सोहळा, संभाव्य नियोजित मंत्रीमंडळ बैठक, तसेच कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होत असलेली स्थिती याबाबत विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड बोलत होते. 

मराठवाड्यात पंधरा वर्षात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका...
कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लोगतो. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना दिलास मिळावा तसेच विभागातील प्रलंबित विकास कामांना गती मिळावी यासाठी विभागात मंत्री मंडळाची बैठक घेण्याची सतत मागणी केली जाते. मात्र, मागील 15 वर्षात विभागात आतापर्यंत फक्त दोन वेळ बैठक झाली आहे. 2008 साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगरमध्ये मंत्री मंडळाची बैठक झाली होती. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group