अकोला : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झालाय. या घटनेत तब्बत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर या मृतांमध्ये सात जण महाराष्ट्रातील होते.
अशातच आता या घटनेनंतर महाराष्ट्रावर आता पुन्हा एक संकट ओढावलं आहे. ते म्हणजे, अकोल्यातील १६ पर्यटकांसह महाराष्ट्रातील जवळपास १००हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये भूस्खलन आणि हिमस्खलनामूळे अडकले असल्याची माहिती आता समोर आली आहे.
सिक्कीममधील लाचूंग येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. राज्यातील पुणे, मुंबई, अकोला आणि नागपुरातील पर्यटकांचा या दुर्घटनेत समावेश आहे. यात अकोल्यातील चार नामांकित डॉक्टरांच्या कुटूंबातील १६ जण अडकले आहेत.
लाचूंग हे ठिकाण सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील नावाजलेले हिल स्टेशन आहे. १६ जणांमध्ये पुरूष, महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे.
अकोल्यातील डॉ. प्रशांत बारापात्रे, डॉ. शितल टोंगसे, डॉ. संजय शिंदे आणि डॉ. प्रभाकर जायभाये हे चार डॉक्टर कुटुंबियांसह अडकले आहेत.
अडकलेल्या चारही कुटुंबांनी आमदार अमोल मिटकरींशी संपर्क साधला आहे. अमोल मिटकरींनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क केला आहे.
या लोकांच्या रेस्क्यूसाठी राज्य सरकारकडून कसोसीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सिक्कीममधील सरकार आणि प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.