ठाणे: भिवंडी शहरात एका सहा वर्षीय चिमुरडीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या नराधमाला पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले. बिहारी पद्धतीने वेषांतर करून त्याला बिहार मधील नवाद गावातून बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सलामतअली आलम अन्सारी (वय 32, रा. नवाद,बिहार) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. विशेष म्हणजे पोलीस पथक आपल्या मागावर गावात असल्याची कुणकुण नराधमाला लागल्याने त्याने मोबाईल बंद केला होता. त्यानंतर पोलीस पथकाने केंद्र आणि बिहार सरकारच्या योजना राबविण्याचा बहाणा करत तिशी वेशभूषा आणि बिहारी भाषा बोलून गावातील नागरिकांना योजनेच्या लाभाविषयी माहिती देत असतानाच, नराधमही या योजनेचा लाभ घेण्यासाठी येताच वेषांतर केलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून अटक केली आहे.
याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात सुरवातीला अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असता चिमुरडीच्या मृतदेहाचा उत्तरणीय अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याने निष्पन्न झाले. पोलिसांनी नरधामाच्या विरोधात हत्येसह अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.
चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अत्याचार
हत्या झालेल्या मृतक चिमुरडीचे 13 सप्टेंबर रोजी आई-वडील कामासाठी निघून गेले होते. त्यावेळी सोबत तिचा नऊ वर्षाचा भाऊ घरी होता. त्यातच चिमुरडी चॉकलेटसाठी परिसरात फिरत असतानाच नराधमाने तिला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह बादलीत कोंबून घराला बाहेरून कुलुप लावून फरार झाला होता. दुसरीकडे चिमुरडी बेपत्ता असताना सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरवात केली.
प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये मृतदेह कोंबून ठेवला
त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी नजीकच्या वऱ्हाळा तलावामध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन घेतले होते. परंतु त्या ठिकाणी चिमुरडी आढळून आली नव्हती. मात्र 15 सप्टेंबर रोजी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता एका कुलूप बंद घर असलेल्या चाळीतील खोली मध्ये प्लास्टिकच्या बकेटमध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले होते.
वेशांतर करून आरोपीला पकडले
पोलिसांनी तात्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात रवाना केला. भिवंडी शहर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदन अहवालामध्ये अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर नराधमाच्या घरात पोलीस पथकाने भौतिक तपास करून त्याचे नाव निष्पन्न केले. आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके बिहार राज्यात रवाना केली होती.
विशेष म्हणजे हा नराधम घटना घडल्याच्या दिवसापासून बेपत्ता झाला होता. शिवाय गेल्या दीड महिन्यापूर्वीच या खोलीत राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी नराधमाची ओळख पटवून त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने वेषांतर करून बिहार मधील नवाद गावातून त्याला झडप घालून ताब्यात घेतले. दरम्यान बिहार पोलिसांच्या मदतीने कारवाई करून भिवंडी पोलीस पथकाने 19 सप्टेंबर रोजी नराधमाला भिवंडीत आणून अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.