देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीचा दरीत ढकलून खून
देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीचा दरीत ढकलून खून
img
दैनिक भ्रमर

पुणे (भ्रमर वृत्तसेवा) :- पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेल्यानंतर तिचा दरीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

पत्नीला दरीत पडल्यानंतर ती झाडात अडकली. त्यानंतर तरुणाने साडीने तिचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले असून, तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

ललिता अमोलसिंग जाधव (वय 36, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय 26) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोलसिंगने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

अमोलसिंगने दिलेल्या माहितीनुसार पोलीस बेपत्ता झालेल्या ललिताचा शोध घेत होते. त्यानंतर पोलिसांना तपासात महत्त्वाची माहिती मिळाली. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. अमोलसिंगने कुटुंबीयांच्या दबाबामुळे वयाने मोठी असलेल्या ललिताशी विवाह केला होता. दोघांमध्ये दहा वर्षांचे अंतर होते. त्याचे पत्नीशी वाद व्हायचे. वयाने मोठी असल्याने पत्नीला त्याने सोडचिठ्ठी देण्यास सांगितले होते. मात्र, ललिताने सोडचिठ्ठी देण्यास नकार दिल्याने तो तिच्यावर चिडला होता.

त्यांच्यात कायम वाद व्हायचे. 28 ऑक्टोबर 2023 रोजी भाडेतत्त्वावर कार घेऊन दोघे जण सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे दर्शनासाठी निघाल्याचे सांगून बाहेर पडले. मांढरदेवी परिसरात पोहोचल्यानंतर त्याने वाहन चालकाला कार वाहनतळावर लावण्यास सांगितले. त्यानंतर दोघे जण घाटातून चालत निघाले. घाटात ललिताशी गप्पा मारण्याचा बहाणा केला. दरीजवळ थांबलेल्या ललिताला त्याने धक्का दिल्याने ती दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर ती झाडाच्या फांदीला अडकली.

अमोलसिंग दरीत उतरला. साडीने गळा आवळून तिचा खून केला. ती मरण पावल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह दरीत ढकलून तो पसार झाल्याची माहिती तपासात उघड झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group