गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मोडासा येथील राणासैयद चौकाजवळ धावत्या अॅम्बुलन्सला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने पूर्ण वाहनाला वेढा दिला. या घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये नर्स भाविकाबेन रमणभाई मनात (वय 22 वर्षे) (मुळगाव: चिठोडा, हिम्मतनगर) आणि डॉ. राज शांतिलाल रेंटिया (वय 35 वर्षे) – डॉक्टर (मुळगाव: चिठोडा, हिम्मतनगर) यांच्यासह नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑरेंज हॉस्पिटलची ही अॅम्बुलन्स एका दिवसाच्या नवजात बालकाला प्रसवानंतर पुढील उपचारांसाठी अहमदाबाद येथे घेऊन जात होती. मोडासा शहरातून जात असताना वाहनाच्या मागील बाजूला अचानक आग लागली. काही सेकंदांतच अॅम्बुलन्सच्या मागील बाजुला आगीने वेढले, ज्यामुळे डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. चालक आणि नातेवाईक मात्र पुढील बाजूने उडी मारुन बाहेर पडले.
स्थानिक पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेचा CCTV फुटेजही समोर आला आहे, ज्यात पेट्रोल पंपाजवळ धगधगत असलेली अॅम्बुलन्स स्पष्ट दिसते. पोलीसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अॅम्बुलन्समध्ये झालेला शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाड हा आग लागण्याचे संभवित कारण मानले जात आहे.