दैनिक भ्रमर :अहमदाबादमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या सेव्हन्थ-डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूलची मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे घंटा वाजली. शाळा सुटल्यानंतर दहावीचा विद्यार्थी नयन आपली बॅग भरून घराकडे निघाला. तो शाळेच्या इमारतीतून बाहेर पडताच ८ वीतील एक ज्युनियर आणि इतर काही मुलांनी त्याला घेरले.
त्यांच्यातील शाब्दिक वादाचे लवकरच हाणामारीत रुपांतर झाले आणि ८ वीच्या मुलाने चाकू काढून नयनवर वार केले आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नयन पोटावर हात ठेवून जखमी अवस्थेत शाळेच्या आत जाताना दिसत आहे. त्याला तातडीने मणिनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समजातच बुधवारी सकाळी सिंधी समाजाचे लोक, बजरंग दल, विहिंप आणि अभाविपचे कार्यकर्ते शाळेत पोहोचले. शाळेत पोहोचताच त्यांनी शाळेबाहेर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शाळेत प्रवेश केला. यावेळी मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली.
हे ही वाचा...
आरोपी आणि त्याच्या मित्राची चॅटिंग समोर
मित्र: भावा, आज तू काही केलंस का?
आरोपी: हो.
मित्र: तू कोणाला चाकू मारलास का?
आरोपी: तुला कोणी सांगितलं? आणि कोण होता तो?
मित्र: एक मिनिट फोन कर
आरोपी: नाही, नाही. मी माझ्या भावासोबत आहे. त्याला आज काय झालं हे माहित नाही.
मित्र: तो (पीडित) मेला आहे.
आरोपी: त्याला सांग की मी त्याला मारलं. तो मला ओळखतो, आत्ताच सांग.
मित्र: प्रत्यक्षात काय झालं होतं पण?
आरोपी: अरे, त्याने (पीडित) मला विचारलं की तू कोण आहेस आणि तू काय करणार आहेस?
मित्र: ### यासाठी तू एखाद्याला चाकूने मारू शकत नाहीस. तू त्याला फक्त मारहाण करू शकला असतास, मारुन टाकायचं नव्हतं.
आरोपी: आता जे झालं ते झालं.
मित्र: स्वतःची काळजी घे. काही काळासाठी गायब हो. या चॅट्स डिलीट कर.
आरोपी: ठीक आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी विद्यार्थी दुसऱ्या समुदायाचा आहे. त्याच वेळी, मृताचे संतप्त नातेवाईक आणि स्थानिक लोक शाळेच्या आवारात घुसले आणि तोडफोड सुरू केली.