अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. पुन्हा एकदा ईडीने मोठी कारवाई करत अनिल अंबानी यांना झटका दिला आहे. अनिल अंबानी यांच्या मुंबईतील पाली हिल येथे असलेल्या घरापासून ते दिल्लीमधील रिलायन्स सेंटर प्रॉपर्टी, दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपूरम आणि गोदावरीमधील संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनील अंबानी आणि त्यांच्या समूहाच्या कंपनीवर कथित फसवणुकीत ईडीने कारवाई केली.
ईडीने अंबानी यांची ३०८० कोटी रूपयांच्या किंमतीच्या ४० संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीमधील अधिकृत सूत्रांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. ईडीने रविवारी अंबानी यांच्या देशभरातील विविध संपत्तीवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली. माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीने संपत्ती जप्त करण्यासाठी चार आदेश जारी केले होते. या संपत्तीमध्ये ६६ वर्षीय अनिल अंबानी यांचे मुंबईतील पाली हिलमधील घर आणि त्यांच्या समूहाच्या कपंन्या, निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.
राजधानी दिल्लीमध्ये महाराजा रणजीत सिंह मार्गावर रिलायन्स सेंटरचा प्लॉट जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई आणि गोदावरीमधील अन्य संपत्तीचा समावेश आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीचं एकूण मूल्य ३०८४ कोटी रूपये इतके आहे. हे प्रकरण रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) यांच्याकडून करण्यात आलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि मनी लाँडरिंग संदर्भातील आहे.
एस बँकेने २०१७ ते २०१९ यादरम्यान आरएचएफएलमध्ये २९६५ कोटींची तर आरसीएफएलमध्ये २०४५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. ईडीकडून करण्यात आलेल्या आरोपांनुसार, डिसेंबर २०१९ पर्यंत ही गुंतवणूक "नॉन-परफॉर्मिंग" गुंतवणुकीत रूपांतरित झाली होती. त्यामध्ये RHFL वर १,३५३.५० कोटी रुपये आणि RCFL वर १,९८४ कोटी रुपये थकबाकी होती. या प्रकरणातच ईडीकडून अनिल अंबानी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.