अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आणखी एक पाऊल टाकलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करत त्यामध्ये तीन नावं वाढवण्यात आली आहेत. आमदार रोहित पवार, मेसर्स बारामती अॅग्रो लिमिटेड आणि राजेंद्र इंगवले यांची नावं कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपावरुन 9 जुलै 2025 ला वाढवण्यात आली आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
ईडीने ९ जुलै २०२५ रोजी या प्रकरणी तिसरी चार्जशीट कोर्टात दाखल केली. त्यात नव्याने ३ जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष कोर्टातील न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी १८ जुलैला तिन्ही आरोपींना समन्स बजावले आहे. येत्या २१ ऑगस्टला या तिघांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
विशेष म्हणजे या प्रकरणात रोहित पवार यांची २०२४ मध्ये ईडीने चौकशी केली होती. जानेवारी २०२४ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. ईडीने २४ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ या दोन्ही दिवशी रोहित पवार यांची अनुक्रमे १२ आणि साडे आठ तास चौकशी केली होती. कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर त्याचा राज्य सहकारी शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते.