
२५ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अनेक बँकांच्या शाखा उघडून मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्यात आल्याने ईडीने तक्रार केली असल्याची खोटी माहिती देऊन सायबर भामट्याने एका वृद्धाला सुमारे दीड कोटीचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अज्ञात मोबाईलधारकाने फिर्यादी महिलेच्या वडिलांना वारंवार कॉल करून त्यांच्या आधारकार्डाचा वापर करून अनेक बँकांच्या शाखा उघडल्या. या बँकांच्या खात्यांतून मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्यात आली असल्याची ईडीने तक्रार केल्याची खोटी माहिती फिर्यादी महिलेस दिली. त्यानंतर या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल, तर फिर्यादी महिलेच्या वडिलांच्या विविध बँक खात्यांमध्ये असलेली रक्कम पडताळणी करण्यासाठी आरोपींनी बँक खात्यांचे क्रमांक देऊन त्यावर या रकमा वर्ग करण्याचे सांगितले.
त्यानुसार फिर्यादीच्या वडिलांची 1 कोटी 31 लाख 15 हजार 529 रुपयांची, तर कु. सायली मिलिंद वनवे यांची 10 लाख 23 हजार रुपये अशी एकूण 1 कोटी 41 लाख 38 हजार 529 रुपये संबंधितांनी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांत जमा केले. त्यानंतर सायबर भामट्यांनी या रकमेची आपापसात कट करून फसवणूक केली. फिर्यादी यांच्या वडिलांच्या वतीने आरोपी मोबाईलधारक, ज्या खात्यांमध्ये रकमा गेल्या, ते बँक खातेदार व त्यांच्यात समन्वय राखणार्या व्यक्तींनी फसवणूक केल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत. हा प्रकार दि. 23 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यानच्या कालावधीत इंटरनेट, फोन व बँक खात्यांद्वारे घडला.
Copyright ©2025 Bhramar