सायबर फसवणूक करणाऱ्या रॅकेटला लगाम घालण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी मोहीम राबवली असून ‘ऑपरेशन चक्र’ अंतर्गत देशभरात 10 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार , या कारवाईत कल्याण येथून प्रतीक तनपुरे या संशयिताला अटक करण्यात आली असून तो सायबर आर्थिक फसवणुकीत सक्रिय सहभाग घेत होता, अशी माहिती सीबीआयने दिली.
सीबीआयच्या पथकाने दिल्ली, लखनऊ, हिसार, मुंबई, पुणे आणि नाशिकसह विविध ठिकाणी छापे टाकले. कल्याणमध्ये अटक करण्यात आलेला तनपुरे हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडण्यास मदत करीत होता. या बँक खात्यांचा वापर फसवणुकीतील रक्कम वळवण्यासाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल डेटा आणि आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
या टोळीने व्हॉट्सॲप ग्रुप्स, बनावट मोबाईल ॲप्स आणि नावाजलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवर सवलतीचे आमिष दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन केला. अनेक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम ‘गुंतवणूक’ म्हणून टाकली.
मात्र, नंतर ती रक्कम गैरवापरासाठी वापरण्यात आली. यामध्ये टोळीने अत्यंत नियोजित आणि गुंतागुंतीचा आर्थिक व्यवहार करत मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.