नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : मोबाईलवर फोन करून सायबर क्राईम मुंबई येथून बोलत असल्याचे भासवून दोन जणांना दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अज्ञात इसमाने आपण क्राईम ब्रँच येथून बोलत असल्याचे फिर्यादी यांना भासवले. तुमच्या मोबाईल नंबर आणि आधारकार्डवर अनधिकृत व्यवहार झाले आहेत, असे सांगून नरेश गोयल याच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणामध्ये देखील तुमचा सहभाग आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्व आर्थिक तपशील व स्थावर मालमत्ता यांची माहिती आम्हाला द्यावी लागेल, असे फोनवर व चॅटिंगद्वारे सांगितले. फिर्यादी घाबरून गेल्याने त्यांनी सायबर भामट्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये 1 कोटी 13 लाख 30 हजार रुपये भरले.
त्याचप्रमाणे या सायबर भामट्याने आणखी एकाला फोन करून मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून त्यांना विविध बँक खात्यांमध्ये 33 लाख रुपये भरण्यास सांगितले. हा सर्व प्रकार दि. 28 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान घडला. हा सर्व प्रकार खोटा असल्याचे समजताच फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याच्या विरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.