पनवेल : ईडीकडून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने शेतकरी कामगार पक्षाचे चार वेळचे आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्यावर मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची स्थावर स्वरुपाची मालमत्ता ईडीने जप्त केलीये.
माजी आमदार विवेक पाटील यांची 152 कोटींची मालमत्ता इडीने जप्त केली आहे. आता जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा आकडा 386 कोटींवर पोहोचला आहे. शेकापचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील हे सध्या कर्नाळा बँक कथित घोटाळा प्रकरणात तळोजा तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली असून, त्यांची 152 कोटींची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आली आहे.
यापुर्वी ईडीने 2021 मध्ये विवेक पाटलांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा स्पोर्टस अॅकॅडमी आणि अन्य ठिकाणच्या जमिनींचाही समावेश आहे. तर आता केलेल्या तात्पुरत्या जप्तीत जमीन, बंगला, निवासी संकुल इत्यादींसह त्यांची कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचा समावेश आहे.
ईडीकडून पाटील यांच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा आकडा आता तब्बल 386 कोटींवर पोहोचला आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर कर्नाळा बँकेत 1 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.
त्यानंतर त्यांच्या बँकेचे ऑडिट झाले, त्यात शेकडो बोगस खाती उघडल्याचे समोर आले, त्यानंतर त्याच्या मागे इडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला, चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. आता पुन्हा एकदा ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, कोट्यवधीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.