"आमचं आता ठरलयं, लागा तयारीला".... भाजप,राष्ट्रवादीच्या बॅनर बाजीने महायुतीची डोकेदुखी वाढली
img
Jayshri Rajesh
लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. कोणाच्या वाट्याला कोणता मतदार संघ जाणार हे अजून जरी नक्की  नसले तरी कार्यकर्ते मात्र जोमात आहेत. त्याचीच प्रचिती बारामती लोकसभेतील इंदापूर विधानसभा मतदार संघात येत आहेत. या मतदार संघात महायुतीतल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बॅनर वॉर जोरदार सुरू आहे. 

या जागेचा तिढा सोडवण्याची डोकेदुखी महायुतीच्या नेत्यांची असणार हे निश्चित. या जागेवर भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबरच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनी दावा केला आहे. 

विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांना होती. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या इंदापूर विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे. पाटील यांचे कार्यकर्तेही जोरात आहेत. महायुतीत ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे अजूनही निश्चित नाही. त्या आधीच हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते हे कामाला लागले आहे. त्यांनी इंदापूरमध्ये जोरदार बॅनरबाजी केली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूरात "आमचा स्वाभिमान आमचे विमान" "आमचं आता ठरलयं, लागा तयारीला विधानसभा 2024" अशा आशयाचे बॅनर जागोजागी लावले आहेत. त्यातून पाटील यांनी वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय पक्षाने उमेदवारी दिलीच नाही तर अपक्ष लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.  

हर्षवर्धन पाटलांच्या या बॅनरबाजीला दत्ता भरणे यांनीही जोरदार उत्तर दिले. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मग इंदापूरात बॅनर झळकवले आहेत. "विकासाची परंपरा कायम राखुया, चला विजयाची हॅट्रीक पूर्ण करुया. शिवाय 'आमचं ठरत नसतं, तर आमचं फिक्स असतं' असं प्रत्युत्तरही भरणेंच्या समर्थकांनी बॅनरच्या माध्यमातून दिलं आहे. 

भाजप,राष्ट्रवादीच्या बॅनर बाजीने महायुतीची डोकेदुखी वाढली असून इंदापूर जागेचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे हे निश्चित. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group