मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भात संकेत देखील दिले होते. त्यानंतर आता त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होताच अजित पवार गटाने मोठी ऑफर जाहीर केली आहे. शरद पवार गटातून अजित पवार गटात आल्यास त्यांचं स्वागत करू, असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शनिवारी शरद पवारांकडे सोपवल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान येत्या १५ जुलै रोजी मंगळवारी शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरु आहे.
त्यामुळे जयंत पाटील पक्षात कोणती भूमिका निभावणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान जयंत पाटील यांना अजित पवार गटाकडून मोठी ऑफर मिळाली आहे.
जयंत पाटील यांचं अजित पवार गटात स्वागत करू, असं अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. संग्राम जगताप म्हणाले की, 'राष्ट्रवादीत ते अस्वस्थ आहेत, असं बोललं जायचं. अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. ते अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील'.