मराठी-हिंदी वादाने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठी आणि महाराष्ट्रासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. राज्यात हिंदी आणि मराठी असा वाद पेटला असतानाच कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत हजारो उत्तर पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
ठाण्यात शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीमध्ये आज काँग्रेस पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर भारतीय मतदारांच्या उपस्थितीमुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा ‘हिंदी पट्टा’ अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात, जय भारत" या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः मराठी अस्मितेवरून ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात मराठी भाषेच्या अवमानावरून शिंदे यांच्यावर जोरदार टीका झाली.
मात्र दुसरीकडे, शिंदे गट मात्र आपली राजकीय गणितं नव्याने आखताना दिसतो आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शहाड परिसरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात काँग्रेसला मोठा झटका देत उत्तर भारतीय समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत सामील करून घेतले. या पक्षप्रवेशामुळे कल्याणच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी-हिंदी भाषेच्या संघर्षाचा वाद अजूनही तापलेला असतानाच, कल्याणमधील ‘उत्तर भारतीय जंबो भरती’मुळे शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
हा पक्षप्रवेश केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर राज्यभरात राजकीय दृष्टिकोनातून चर्चेचा विषय ठरला आहे.