सोलापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.
पालखी सोहळ्यात राजकारण आणू नये, पालखी सोहळ्यात कॅटवॉक करण्यापेक्षा पालखी जीथे मुक्कामी असेल तिथे येऊन दर्शन घ्यावे, असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले निंबाळकर?
‘आज आम्ही पालखी सोहळ्याच्या प्रमुखांना भेटलो, आणि त्यांना विनंती केली की या वैष्णवांच्या सोहळ्याचा उपयोग राजकारणाच्या प्लॅटफॉर्मला कोणाला करू देऊ नका, राहुल गांधी येणार ते पालखीत चालणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांचा फायदा घेण्याचं कारस्थान काही राजकीय पक्ष करत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, यांच्या उभ्या आयुष्यात यांनी कधी विठ्ठलाचं आणि माऊलीचं दर्शन घेतलं नाही. याउलट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांसाठी हा महामार्ग बनवला. फलटण-पुणे-पंढरपूर रेल्वेला मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेद्र फडणवीस यांनी दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी पंढरपूरच्या विकासासाठी दिला. असं असताना देखील भाजपचे नेते राजकारणासाठी वारकरी संप्रदायाचा उपयोग करत नाहीत.
मात्र काही लोक राजकारणासाठी वारीचा प्लॅटफॉर्म वापरत आहेत. वारकरी संप्रदायाला डाग लागता कामा नाही, ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं आहे, त्यांनी पालखीच्या मुक्कामस्थळी जाऊन दर्शन घ्यावं. निश्चितपणे त्यांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी वारीत कॅटवॉक करू नये अशी आमची भूमिका असल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.