देशभरात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, प्रचार, सभा, याद्या, निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ व मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये रणनिती आखण्यासाठी भाजपने मोठी रणनिती आखली आहे.
निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी भाजप आक्रमक प्रचार करणार आहे. त्यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत महाराष्ट्रातील भाजप नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह यांचा देखील स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, या सर्व ४० नेत्यांच्या ४० ठिकाणी सभा घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे. या रणनीतीला कार्पेट बॉम्बिंग असेही म्हटले जात आहे. दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून काही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये राजस्थानमधील २०० पैकी ४१, मध्य प्रदेशच्या २३० पैकी १७७, मिझोरामच्या ४० पैकी १२, छत्तीसगढच्या ९० पैकी ८५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
तेलंगणाच्या उमेदवारांची आतापर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसकडून देखील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने सुद्धा विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवार घरोघरी जाऊन मतांचे आवाहन करत आहेत.
दरम्यान, या ५ राज्यांमधील २०१८ च्या निवडणुकांचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे त्या वेळी या सर्व राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. आज राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. मध्य प्रदेशात भाजपने पक्षांतर करून सत्ता काबीज केली. मिझोराम आणि तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे पाच राज्यांमध्ये एकसारखी स्थिती नाही. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.