भारताचा पाकिस्तानला जोर का झटका; 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळे उध्वस्त
भारताचा पाकिस्तानला जोर का झटका; 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळे उध्वस्त
img
दैनिक भ्रमर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून करारा जवाब दिला जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते. त्यानुसार भारताने आज एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला जोर का झटका दिला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सरकार आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी यांच्यात बैठकांचा धडाका  सुरू होता.
अखेर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला.

भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जिथून दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि निर्देश केले जात होते. भारतीय वायुसेनेकडून रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास 'ऑपरेशन सिंदूर' सुरु करण्यात आले.

या हल्ल्याबाबत संरक्षणखात्याकडून माहिती देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर'सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. ज्याठिकाणाहून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंग केले जात होते.

भारताने स्ट्राइकची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच, भारतीय लष्कराने ट्विटरवर पोस्ट केले, "न्याय झाला. जय हिंद." एका वृत्तानुसार, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानी हद्दीत मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील अहमद पूर्व भागात तीन ठिकाणी लक्ष्य केले असल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने केली. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारतानं बराच संयम दाखवल्याचंही यावेळी संरक्षण खात्यानं म्हटलं आहे.

पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले असल्याचंही नमूद केलं आहे. ज्यामध्ये 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही ही कारवाई केल्याचंही सांगण्यात आले आहे. या 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल सविस्तर माहिती आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन देण्यात येणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांतील संबंध प्रचंड तणावाचे झाले आहेत. अनेक कठोर निर्णय घेतले जात असतानाच दोन्ही देशांकडून युध्दाची तयारीही सुरू केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील राज्यांना अलर्ट केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group