लोकसभा निकालाने राज्यातील समीकरणे बदलली आहेत. मोठ्या यशाची अपेक्षा असताना पदरात पराभव आल्याने महायुतीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पराभवाची कारणं शोधली जात आहे. महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी ही महायुतीसाठी धक्कादायक आहे. राज्यातील अंडरकरंट दुर्लक्षित केल्याने हा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यात वेगाने घडामोडी घडत आहे. केद्रांत सत्ता स्थापन्याच्या हालचाली वाढल्यानंतर महायुतीतील नेते, खासदार दिल्लीकडे कुच करणार आहेत. पण त्यापूर्वी मुंबईत बैठकांमागून बैठकांचे सत्र सुरु आहे.
वर्षा बंगल्यावर बैठक
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १ वाजता सर्व खासदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक होत आहे. रात्री मुख्यमंत्री सर्व खासदारांसोबत दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत सरकार स्थापनेच्या वेळी ते प्रत्यक्ष हजर असतील.
विजयानंतर खासदारांची वर्षा बंगल्यावर पहिली बैठक होत आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात दोन मंत्रीपदे आणि एक केंद्रीय राज्य मंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. खासदार प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे हे मंत्रीपदाच्या रेसमध्ये असल्याचे समजते.
फडणवीसांची दिल्लीवारी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. राज्यातील पराभवानंतर ते दिल्लीत जाणार आहेत. त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. आज फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयावर ही चर्चा अपेक्षित आहे.
आमदारांमध्ये अस्वस्थता
राष्ट्रवादी काँग्रेसची आज अजित पवार यांच्या निवास्थानी बैठक होत आहे. महायुतीला राज्यात मिळालेले अपयश आणि राष्ट्रवादीच्या उमेदवांराचा झालेला पराभव यावर बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीला मिळालेले यश यामुळे अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता अशी चर्चा आहे. शरद पवार गटाकडून काही आमदारांना सातत्याने बोलले जात आहे. अनेक आमदार संपर्कांत किंवा आमदार परत येऊ शकतात असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. महायुतीला मिळालेले अपयश यामुळे आमदारांना एकसंध ठेवणे अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.